ऐसी अक्षरे

:- कथा
:- कविता
:- लेख
:- अनुवाद
:- हिंदी
:- English
:- संग्रह
:- इतर

मंदार शिंदे
Mandar Shinde

Sunday, June 8, 2014

काय शिकवायचं आणि काय नाही?

लहानपणापासून, रामानं रावणाला मारलं, पांडवांनी कौरवांना संपवलं, शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, अशा हिंसक गोष्टी संदर्भहीन पद्धतीनं शिकवल्यावर, मोठेपणी गांधीजींचं अहिंसेचं तत्वज्ञान पटण्याची अपेक्षा कशी करता येईल? सुष्ट कोण आणि दुष्ट कोण हे कसं आणि कुणी ठरवायचं? पौराणिक व ऐतिहासिक गोष्टींमधला संदर्भ काढून टाकून, फक्त मारामारी आणि भव्यदिव्य युद्धांवर फोकस करणारी 'ब्रेकिंग न्यूज' स्टाईल शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे, असं नाही का वाटत? युद्धामागची परिस्थिती आणि लॉजिक लक्षात न घेता, प्रत्यक्ष युद्धवर्णनात आपण जास्त रंगून जात नाही ना, याचं भान शिक्षकांनी आणि पालकांनी राखलंच पाहिजे. ज्या धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजव्यवस्थेत आपण राहतो आहोत तिथल्या शाळांमधून, धर्मांची शिकवण, क्षत्रियाचा धर्म म्हणून 'वध' माफ, मुसलमान 'परके' म्हणून त्यांची कत्तल, अमूक या धर्मातला मोठा नेता, तमूक त्या जातीचा तारणहार, अशा कन्फ्युजिंग आणि मिसलीडिंग गोष्टी वेचून काढून टाकल्या पाहिजेत. आडनावावरुन जात ओळखायचा खेळ आपल्या पिढीपासून तरी बंद केला पाहिजे. शाळा-कॉलेजच्या वर्षांमधे मुलांना कोणत्याही अर्जावर जात-धर्म लिहिण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. संदर्भहीन इतिहास शिकवण्यापेक्षा, वर्तमान आणि भविष्यात उपयोगी पडेल असं सामाजिक भान - सिव्हिक सेन्स, सहिष्णुता, आपण करत असलेल्या कामाप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, अनुकंपा - कम्पॅशन, कला-क्रीडा-विचारांनी आयुष्य समृद्ध बनवण्याचं कौशल्य, अशा कितीतरी गोष्टी पुढच्या पिढीला शिकवल्या पाहिजेत. फुटकळ अस्मितांमधे गुरफटून जाण्याऐवजी, 'आपल्या' देशाप्रती आपल्या जबाबदार्‍या व त्यायोगे उपभोगायला मिळणारं स्वातंत्र्य नि अधिकार जाणून घेणं मुलांसाठी जास्त महत्त्वाचं नाही का? हे सगळं पटत असेल तर, सरकारनं सिलॅबस बदलावा - शाळेनं शिक्षक बदलावेत, वगैरे शेळ्या न हाकता, तुम्ही काय कराल, हे उंटावरुन खाली उतरुन सांगा. मी स्वतः तर करतोच आहे, तुम्हालाही काही करावंसं वाटलं तर या. खूप हातांची आणि डोक्यांची गरज आहे इथं. शेवटी प्रश्न नवी पिढी घडवण्याचा आहे ना!


Share/Bookmark

No comments:

Post a Comment